चलबिचल
मी फक्त चालतोय.
चालतोय.
हे झाड नवीन आहे.
फोटो काढावा का बघत राहावं तसंच?
एडिट किती करू टाकू कुठे कॅप्शन काय
फांदी हलली फोकस हलला पुन्हा प्रयत्न करावा का तोही फसला किती वेळा
असू देत.
मी फक्त चालतोय.
चालतोय.
आज रविवार आहे.
उद्या अभ्यास आहे परवा लेक्चर्स आहेत
तयारी अपूर्ण आहे प्रकल्प अर्धवट आहे
सत्र पुढे मार्क हवेत परीक्षा जवळ एकच संधी पुन्हा मिळेल पण उशीर होईल
वेळ आहे.
मी फक्त चालतोय.
चालतोय.
सकाळचे नऊ वाजलेत.
पुण्यात पहाट झाली घरची मंडळी उठली
सोबत्यांच्या दिवस सुरु ग्रुप उघडला चर्चा सुरु झाली
एक फोटो दोन काळिजं तीन टाळ्या पाच विस्फारले डोळे आठ स्वर दहा भावना
शून्य लक्ष.
मी फक्त चालतोय.
चालतोय.
वर्तमान चालू आहे.
भविष्यातील क्षण येतो भूतामध्ये विरून जातो
काळ पुढे सरकत राहतो चक्र कायम फिरत राहतं
कालचक्र मूलकण विश्वरचना वित्तशास्त्र साहित्य कला तात्त्विक विवंचना
गोठले आहेत.
मी फक्त चालतोय.
चालतोय.
काही महिनेच उरले.
वास्तव्य तिकडे हलेल इथले संपेल
काम त्यानंतर बदलेल दिनक्रम त्यानंतर बदलेल
दिशा बदलेल जबाबदारी वाढेल वेळ कमी कमी हाती उरेल संपून जाईल
सवड आहे.
मी फक्त चालतोय.
चालतोय.
स्वच्छ हवेचा सुगंध
पावलांना मातीचा स्पर्श चेहऱ्यावर दवाचे थेंब
हिरव्या जगातली वळणांची वाट थोड्या अंतरावर कट्ट्यांची साथ
घोट घेतला विश्रांती घेतली उत्साह आला उभा राहिलो पावले लगबगीने पुढे निघाली
एवढेच पुरे.
मी फक्त चालतोय.
💚
ReplyDeleteसिंगापूर सोडायची वेळ जवळ येत चालली म्हणून हे विचार येत आहेत का मनात? " अजून चालतोची वाट " अशी एक कविता आहे. पण आता तर पुढची चांगली वाट सापडणार आहे,यापेक्षा सुंदर अनुभव येणार आहेत कारण " चरति चरतो भग: " असे संस्कृत वाक्य आहे म्हणजे चालणाऱ्याचे भाग्य उजळते.असो. कविता छान जमली आहे.
ReplyDelete👌👌
ReplyDelete